महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वारी, भात, ऊस, इ. पिके खरीपात तसेच गहू, हरभरा इ. पिके रबी हंगामात
घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच अंशी वाढला आहे. या किडीच्या
उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते.
शाश्वत पाणीपुरवठ्याच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा जास्त होत
असल्याने हुमणी अळीचा प्रार्दुभाव वाढत आहे. या किडीकडे दुर्लक्ष झाल्यास पिकाचे नुकसान होणार हे निश्चित आहे.
हुमणीच्या नुकसान करणाऱ्या मुख्य दोन अवस्था
- भुंगेरा व अळी पिकाचे नुकसान करत असतात.
- भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात.
- अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पिक वाळून जाते. जास्त प्रादूर्भाव
झाल्यास शेतातील संपूर्ण पिक नाश पावते.
हुमणी अळीच्या जीवनक्रम
अंडी
मादी भुंगेरे साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी जमिनीत १२ ते १५ सें.मी. खोलीवर एक-एक अशी सुट्टी घालतात. त्यावर मातीचे वेस्टन केले जाते. एक मादी सर्वसाधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. अंडी रंगाने पांढरी असतात. अंड्यातून अळी बाहेर पडताना ती तांबूस रंगाची होते.
साधारणतः ९ ते १२ दिवसांनी अंडी उबतात.
अळी
अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीला हुमणी असे म्हणतात. सुरुवातीस अळी काही दिवस सेंद्रीय
पदार्थांवर जगते व नंतर पिकाच्या मुळावर हल्ला करते. अळी रंगाने पिवळसर पांढरी असते. ही लहान अळी ६ ते ८ महिन्यात ३ ते ५ सें.मी. वाढते व ३ वेळा कात टाकते. पूर्ण वाढलेली अळी पांढऱ्या
रंगाची अर्धचंद्राकृती असते. पोटाचा भाग चकचकीत काळसर व सुरकुत्याविरहित असतो. तोंडाचा
जबडा दणकट व गडद तांबूस रंगाचा असतो. आर्थिकदृष्ट्या अळी अवस्थाच जास्त महत्त्वाची आहे. कारण ती पिकाच्या मुळांवर उपजिवीका करते व त्यामुळे पिक सुकते. पूर्ण वाढ झालेली अळी
जमिनीत १० ते १५ सें.मी. खोलवर जाऊन मातीचे कवच बनवते व त्यात सुप्तावस्थेत जाते.
कोष
हा तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो. २० ते २५ दिवसांत कोषातून भुंगेरे बाहेर पडतात व
जमिनीतच ते काही काळ निष्क्रिय अवस्थेत राहतात. वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाहेर पडतात.
भुंगेरे
कोषातून बाहेर पडलेला भुंगेरा सुरुवातीस पिवळसर पांढरट रंगाचा असतो व त्याचे पंख पांढरट
तपकिरी असतात. कालांतराने शरीर व पंख कठीण बनतात व रंग तांबूस तपकिरी होतो. भुंगेऱ्याचे पंख जाड व टणक असतात, त्यामुळे ते लांबवर उडू शकत नाहीत. नरापेक्षा मादी आकाराने मोठी असते. भुंगेरे साधारणतः ८० ते ९० दिवस जगतात. हुमणीची एक पिढी पूर्ण होण्यास तिला एक वर्षाचा कालावधी लागतो.
नियंत्रण
हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
अ) भुंगेऱ्यांचा बंदोबस्त
- पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात.
- अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत व रॉकेल मिश्रीत
पाण्यात टाकून मारावेत हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल.
ब) जैविक नियंत्रण
- हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रुंचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. बगळा, चिमणी,मैना,
कावळा, घार इ. व मांजर,रानडुक्कर, मुंगुस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
- जीवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरोहॅब्डेटीस) हे होलोट्रॅकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.
क) हुमणी अळीचा बंदोबस्त
- पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सें.मी. खोल नांगरट करावी. त्यामुळे उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
- आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करून लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात.
- पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून साचलेल्या पाण्यामध्ये अळ्या मरतील.
- हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उपटावीत व मुळाशेजारील अळ्यांचा नाश करावा.
- खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
पीक | किटकनाशके | मात्रा |
भुईमूग | फोरेट १० % दाणेदार | १० कि. /हे . |
फ्रेंच घेवडा | कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार | २३.३ कि.ग्रॅ./ हेक्टर |
बाजरी, ज्वारी, ऊस, भुईमूग | फोरेट १० % दाणेदार | २५ कि.ग्रॅ./ हेक्टर |
ऊस | फिप्रोनील ०.३ % दाणेदार | ३३ कि.ग्रॅ./ हेक्टर |
ऊस | फिप्रोनील ४० % दाणेदार + इमिडायक्लोप्रिड ४० % डब्लू जी | प्रति हेक्टर ५०० ग्रॅम १२५० लि. पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत सोडावे. |
Post Views: 40
Leave a Comment